
महापालिकेकडून ४३ झोपड्यांचे निष्कासन; ३८,७५० चौ.फुट जागा अतिक्रमणमुक्त
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणेस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुन्हा एकदा कारवाईची कडक भूमिका घेतली आहे. वाकड–ताथवडे परिसरातील १८ मीटर रुंद नियोजित रस्त्याच्या मार्गातील ४३ झोपड्यांवर कारवाई करत सुमारे ३८,७५० चौरस फुट क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
ही कारवाई झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, व शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
काळाखडक, वाकड येथील सर्वे नं. १२४/१ या मिळकतीजवळील मंजूर विकास योजनेतील भूमकर चौक ते ताथवडे सीमेपर्यंतच्या १८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या झोपड्या अडथळा ठरत होत्या. सुमारे २०० मीटर लांब व १८ मीटर रुंद रस्त्यावर ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग, अतिक्रमण विभाग, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अग्निशामक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांचे सहकार्य लाभले. या कारवाईसाठी ४ पोकलेन मशीन, ४ जेसीबी, ६ डंपर आणि २० मजुरांचा वापर करण्यात आला.
“शहरातील विकास योजना व सार्वजनिक सुविधांची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. वाकड–ताथवडे भागातील ही कारवाई त्याचाच एक भाग असून, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला दिलासा मिळेल.”
-शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका
About The Author
