
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी
हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, पिंपरी-चिंचवड येथील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हाफकिन व्यवस्थापनाला ठोस निर्णय घेण्याचे आदेश दिले.
या बैठकीस हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर, कामगार प्रतिनिधी, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या वेतनाव्यतिरिक्त थकीत देयके, निवासस्थानी सुविधा आणि नुतनीकरण, दुर्घटनांप्रती जबाबदारी, सातवा वेतन आयोग, पदोन्नती आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
“कामगारांचे हक्काचे पैसे प्रलंबित ठेवणे योग्य नाही. त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तत्काळ कृती होणे आवश्यक आहे,” असे मत उपाध्यक्ष बनसोडे यांनी व्यक्त केले.
त्यांनी अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात सर्व संबंधित कागदपत्रांसह बैठक घेण्याचे आदेश दिले. विशेषतः, पिंपरी-चिंचवड विभागातील थकीत देयके किती आहेत, याची स्पष्ट माहिती सादर करण्यास सांगितले.
यासोबतच, हाफकिनने तयार केलेल्या औषध व इंजेक्शन्सची विक्री पुणे महानगरपालिकेला करण्याचा प्रस्ताव पुढे आणावा, असेही बनसोडे यांनी सुचवले. “या विक्रीतून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग कामगारांच्या थकीत देयकासाठी करता येईल. मी स्वतः यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सदर बैठकीला विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दीपक पेडणेकर (सरचिटणीस), नितीन तिटिकर (उपाध्यक्ष), मंगेश कदम (खजिनदार), डॉ. कैलासभाऊ कदम (अध्यक्ष, इंटक – महाराष्ट्र), उत्तम लक्षण गायकवाड (अध्यक्ष), सुजित गांगुर्डे (सेक्रेटरी), रमाकांत हळदीकर (खजिनदार), शांताराम कदम (उपाध्यक्ष), दिनेश जगताप (सदस्य) आदींचा समावेश होता.
कामगारांच्या हितासाठी ही बैठक एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, लवकरच ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे संकेत मिळत आहेत.
About The Author
