
३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरा आणि मिळवा ४ टक्के सवलत!
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत मालमत्ताधारकांसाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्यांना थेट ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेवर कर भरण्यासाठी सातत्याने आवाहन केले जाते. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा यांसारख्या नागरी सेवांची अंमलबजावणी सुरळीत राहण्यासाठी मालमत्ता कर हा मोठा आर्थिक आधार आहे. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महापालिकेला या सेवा अधिक प्रभावीपणे पुरवता येतात.
या पार्श्वभूमीवर, महापालिकेने ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या करावर ४ टक्के सूट जाहीर केली आहे. ही सवलत केवळ ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या करदात्यांसाठीच आहे.
महापालिकेच्या या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीच तुमचा मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने भरा. ही सवलत तुमच्या घरखर्चावर दिलासा देणारी ठरेल आणि शहराच्या प्रगतीत तुमचे योगदान अधिक प्रभावी ठरेल.
ऑनलाइन कर भरण्याची सोपी पद्धत:
1. www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2. ‘नागरिक’ विभागातील ‘मालमत्ता कर विभाग’ पर्याय निवडा.
3. तुमचा मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक भरा.
4. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा.
5. ‘बिल भरा’ हा पर्याय निवडा आणि तुमचा कर सवलतीसह भरा.
“मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार आहे. वेळेवर कर भरल्यास महापालिकेला नागरी सेवांचा दर्जा उंचावता येतो. ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना देण्यात येणारी ४ टक्के सवलत ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे.”
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“मालमत्ता कर भरणे ही फक्त कायदेशीर जबाबदारी नसून, शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले योगदान आहे. नागरिकांनी थकबाकी न ठेवता वेळेत कर भरावा, जेणेकरून सेवा अधिक सक्षमता आणि गुणवत्ता यांसह पुरवता येतील.”
— अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
About The Author
