Spread the love

३५० हून अधिक नागरिकांचा सहभाग

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ३५० हून अधिक नागरिकांनी विविध वैद्यकीय सेवा व तपासण्यांचा लाभ घेतला, तसेच १०० हून अधिक नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या हस्ते, माजी महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. तृप्ती सागळे (ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी), डॉ. वैशाली भामरे (नोडल अधिकारी), डॉ. प्रज्ञा बडगे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. देवयानी लोंढे (फिजिशियन) आणि डॉ. दीपक पाटील (बालरोगतज्ज्ञ) हे मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

शिबिरात दंत तपासणी, नेत्र व कान-नाक-घसा तपासणी, बालक व किशोरवयीन मुलांचे आरोग्य तपासणी, गर्भवती व वृद्ध नागरिकांची तपासणी, मानसिक आरोग्य मूल्यांकन, लसीकरण, रक्त तपासणी तसेच आवश्यक औषधांचे वितरण या सर्व सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच आयुष्मान कार्डे आणि आभा कार्डे तयार करण्याची सुविधा देखील नागरिकांसाठी ठेवण्यात आली होती.

विशेष आकर्षण ठरले ते भूलतज्ज्ञ डॉ. मोनाली क्षीरसागर यांचे सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) याविषयी दिलेले प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व मार्गदर्शन, जे उपस्थित नागरिकांसाठी खूप उपयोगी ठरले.

 

“महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती हे एकाच ठिकाणी मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेचा ठोस प्रयत्न आहे.”

— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

“महापालिकेच्या रुग्णालये आणि मोफत आरोग्य शिबिरे या दोन्ही गोष्टी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत. प्रतिबंधात्मक तपासण्या व लसीकरणाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांचे आरोग्य सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

— डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *