
तहान भागवणाऱ्या पवनामाईला सलाम; पत्रकारांच्या वतीने जलपूजन सोहळा
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
शहराची जीवनवाहिनी असलेले पवना धरण यंदा शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. “पवना धरण पिंपरी-चिंचवडचे प्राण” असे गौरविले जाणारे हे धरण शहराच्या अस्तित्वाचे खरे अधिष्ठान आहे. यानिमित्ताने आज शनिवार (दि. १३ सप्टेंबर) रोजी पत्रकारांच्या वतीने जलपूजनाचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते पवनामाईचे पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुनिल ऊर्फ बाबू कांबळे, गणेश शिंदे, प्रविण शिर्के, विनय लोंढे, संतालाल यादव, सुरज साळवे, देवा भालके, जितेंद्र गवळी, दिलीप देहाडे, संतोष जराड आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बापूसाहेब गोरे म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून पवना धरण भरल्यानंतर पत्रकारांच्या वतीने जलपूजनाची परंपरा सुरू आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पत्रकारांनीच पुढाकार घेतला. पवनामाई वर्षभर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवते. तिच्या आदरार्थ व कृतज्ञतेपोटी हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो.”
धरण भरून पंधरा दिवस उलटून गेले असले तरी गणेशोत्सवाच्या व्यस्त कामामुळे जलपूजन उशिरा पार पडले. अखेर आज विधिवत पूजन करून परंपरेचा मान राखण्यात आला. पूजनानंतर पत्रकारांनी जलविहाराचा आनंद घेतला.
हा उपक्रम केवळ एक विधी नाही, तर पिंपरी-चिंचवडच्या जीवनवाहिनीला अर्पण केलेली भावपूर्ण मानवंदना आहे.
About The Author
