Spread the love

“स्वतःशी भेट घ्या, आनंदी जीवन जगा” – गुरुदेव मनोजजी जैन यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथे ‘प्रेमगंध विश्व’ आयोजित एक दिवसीय ध्यान साधना शिबिर उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाले. या शिबिराला साधकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत तब्बल १००० हून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत अंतर्मनाशी संवाद साधण्याचा अनोखा अनुभव घेतला. शिबिराच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमात माँ विदेहीजी यांनी ध्यान साधनेचे महत्त्व स्पष्ट करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. योग्य पद्धतीने श्वास घेणे आणि सोडणे यामुळे शरीर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम त्यांनी उदाहरणांसह सांगितले. “श्वास हा जीवनाचा पाया आहे, तो योग्य पद्धतीने घेतल्यास जीवनात स्थैर्य आणि शांतता येते,” असे त्यांनी नमूद केले. उपस्थित साधकांकडून प्रत्यक्ष साधना करून घेतल्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.

या शिबिराला ‘प्रेमगंध विश्व’चे संस्थापक गुरुदेव श्री. मनोजजी जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “स्वतःला वेळ देणे आणि स्वतःवर प्रेम करणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित ध्यान साधनेमुळे भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारते.” त्यांनी पुढे सांगितले की, “भगवंताला शोधण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही; तो आपल्या आतच आहे. त्यासाठी प्रथम स्वतःशी भेट घेणे आवश्यक आहे.”

या शिबिराचे नियोजन तळेगावातील साधिका सौ. मीना दाभाडे, सौ. जयश्री सावंत, श्री. शंकर काका रागमहले, श्री. बाळासाहेब दाभाडे, श्री. सुनील किर्वे, श्री. सोमनाथ ननावरे आणि सौ. पायल कुलकर्णी यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने केले. स्थानिक साधकांनीही उत्स्फूर्त सहकार्य करत कार्यक्रमाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.

शिबिराच्या शेवटी साधकांनी आपले अनुभव मांडताना ध्यान साधनेमुळे मानसिक हलकेपणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. अनेक नवीन साधकांनीही या साधनेचा लाभ झाल्याचे नमूद करत पुढील शिबिरांविषयी उत्सुकता दर्शवली.

कार्यक्रमाला तळेगाव व परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. पंचायत समिती सदस्या सौ. शुभांगीताई ढोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माँ प्रमोदिनीजी यांनी केले.

या ध्यान शिबिराविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९०६७७५०६६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *