Spread the love

४ ऑक्टोबरला पाच हजारांहून अधिक वादक एकत्र येणार; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ आणि १२८ मीटर उंच भगव्या ध्वजाला मानवंदना देण्याचा संकल्प

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोशीत पुन्हा एकदा हजारो ढोल-ताशांचा निनाद घुमणार आहे. मागील वर्षीच्या भव्य सोहळ्यानंतर यंदाही मोठ्या प्रमाणावर ढोल-ताशा पथकांना एकत्र आणण्याची तयारी करण्यात आली असून, तब्बल पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सामूहिक वादनातून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हा महासोहळा रंगणार आहे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी मोशीत झालेल्या सामूहिक ढोल-ताशा वादनाने मोठे लक्ष वेधून घेतले होते. यंदा त्याहून व्यापक स्वरूपात सोहळा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून ढोल-ताशा पथके पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार असून, हजारो वादकांच्या एकत्रित वादनातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजालाही या सोहळ्यात मानवंदना देण्यात येणार आहे. ‘धर्मध्वज’ म्हणून त्याचा उल्लेख आयोजकांनी केला असून, जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज म्हणून त्याची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या कार्यक्रमाला धार्मिक-सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

विश्वविक्रमाच्या दाव्याबाबत आयोजकांनी स्पष्ट केले की, पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. विविध पथकांचे एकत्रित वादन झाल्यानंतर विक्रमासंदर्भातील अधिकृत पुष्टी करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी होणाऱ्या सामूहिक वादनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले की, गतवर्षीच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या आठवणी आजही पथकांच्या मनात ताज्या आहेत. यंदा पाच हजारांहून अधिक वादक एकत्र येत असल्याने सामूहिक वादनाचा निनाद हा सोहळ्याचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली स्मृतींना वंदन करण्याबरोबरच निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजाला ऐतिहासिक मानवंदना देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकार परिषदेला ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ आणि सदस्य प्रशांत वायकर उपस्थित होते. नागरिकांनी या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *