Spread the love

आमदार महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे; जागा, निधी, मनुष्यबळासह कालबद्ध प्रस्ताव तयार करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती आरोग्यसेवेची गरज आणि वैद्यकीय शिक्षणासाठी शहरातील विद्यार्थ्यांना करावा लागणारा अतिरिक्त खर्च लक्षात घेता, वायसीएम रुग्णालयाशी संलग्न शासकीय अथवा महापालिका वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्याची मागणी केली आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे ४० लाखांपर्यंत पोहोचली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप शासकीय किंवा महापालिकेचे एमबीबीएस महाविद्यालय नसल्याकडे लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अर्थात वायसीएममध्ये पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र, एमबीबीएसचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक विद्यार्थ्यांना पुणे, अन्य जिल्हे किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासगी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च हा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत असल्याचे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. त्यांच्या पत्रातील अंदाजानुसार, काही खासगी संस्थांमध्ये साडेचार वर्षांच्या एमबीबीएस शिक्षणाचा शुल्क, निवास आणि इतर खर्च मिळून सुमारे १.४८ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हा आकडा सर्व खासगी महाविद्यालयांना लागू नसून पत्रात नमूद केलेला खर्चाचा अंदाज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे शहरातच शासकीय किंवा महापालिका वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध झाल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची अधिक परवडणारी संधी उपलब्ध होऊ शकते, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे.

वायसीएम रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी महापालिकेचा ठोस प्रस्ताव अद्याप तयार नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून समजल्याचे लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, नगरविकास विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महाविद्यालयासाठी आवश्यक जागा, आर्थिक तरतूद, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषांची पूर्तता यांचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव निश्चित कालमर्यादेत तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

“पिंपरी-चिंचवाडमधील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी शहराबाहेर जावे लागते किंवा खासगी महाविद्यालयांचा मोठा खर्च करावा लागतो. वायसीएमशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल. त्याचबरोबर शहराच्या आरोग्य व्यवस्थेलाही प्रशिक्षित डॉक्टरांचे बळ मिळेल. त्यामुळे राज्य शासनाने महापालिकेकडून कालबद्ध प्रस्ताव मागवून त्यावर निर्णय घ्यावा,” अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास वैद्यकीय शिक्षणासोबतच शहरातील सार्वजनिक आरोग्यसेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या विस्तारालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *