‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत महापालिकेचा उपक्रम; आरोग्य तपासणीसह सुरक्षा साधनांचे वाटप
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष उपक्रम राबविला. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सफाई मित्र सुरक्षा शिबिरांमध्ये शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील ३ हजार ५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसोबतच सुरक्षित कार्यपद्धती आणि आरोग्यविषयक सवयींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
२८ आणि ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील सफाई सेवकांनी सहभाग घेतला. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात आली. कामाच्या स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक अडचणी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि ताणतणावाचे व्यवस्थापन याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
काम करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा योग्य वापर करणे, आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सवयी अंगीकारणे तसेच आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “सफाई सेवक हे शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर आणि नियमित आरोग्य तपासणी या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतात. त्यामुळे सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे.”
दरम्यान, कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा विचार करून डॉ. ठेंगल यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सफाई सेवकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या शिबिराच्या माध्यमातून समाज विकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनांची माहितीही देण्यात आली. महिला बचतगट, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण तसेच विविध आर्थिक सहाय्य योजनांबाबत पात्र महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आर्थिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा या योजनांचा उद्देश असल्याचे डॉ. ठेंगल यांनी सांगितले.
शिबिरास डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शंकर मोसलगी, डॉ. कुलभूषण कुलकर्णी, डॉ. तुषार जाधव, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, कांचनकुमार इंदलकर, योगेश फल्ले यांच्यासह आरोग्य निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले. सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
About The Author


