
Doctor with stethoscope in white lab coat holding sign reading prostate cancer
४५ वर्षावरील पुरुषांनी नियमित PSA चाचणी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
तळेगाव : प्रतिनिधी
भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्वात सामान्य आहे आणि एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी ३% आहे. काही वर्षांपुर्वी भारतात प्रोस्टेट कॅन्सर हा ११ व्या क्रमांकावरील कॅन्सर मानला जात होता, मात्र आता हा कॅन्सर तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. येत्या १० वर्षांत देशातील प्रोस्टेट कर्कैरोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात या आजाराबाबत जागरुकतेचा अभाव आणि सुरुवातीच्या लक्षणांचा अभाव असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रोस्टेट कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरुषांचे वाढते वय, वृद्धत्वामुळे, प्रोस्टेटमधील पेशींची वाढ आणि विभाजन कमी होत नाही, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होऊ शकतात. प्रोस्टेट ग्रंथी ही पुरुष प्रजनन प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अक्रोडाच्या आकाराची आणि मूत्राशयाच्या खाली स्थित हा भाग वयानुसार वाढतो.
टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल सांगतात की, प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. विशेषत: ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी, नियमित PSA चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. त्याच वेळी, जर त्याच्या कुटुंबात आधीच प्रोस्टेट कर्करोगाचा रुग्ण असेल तर त्याने ही चाचणी वयाच्या ४० व्या वर्षापासून सुरू करावी.
कसा कराल प्रतिबंध?
चहा, कॉफी व मद्यसेवन टाळणे, ज्यांना जोखीम आहे त्यांनी रात्री आठनंतर पाणी पिणे टाळावे .दिवसभर लघवी न रोखणे, नियमित व्यायाम करणे, बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही याची खबरदारी घेणे,चिंता व तणावरहित जीवन जगणे.
प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीकडे दुर्लक्ष करता कामा नये. या ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रवाहिनीवर दाब येऊन मूत्रवाहिनीत अडथळे निर्माण होतात, त्याचा एक परिणाम म्हणून मूत्राशयात खडे होण्याची शक्यता वाढू लागते. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रनलिकेतील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या फुटू शकतात व लघवीतून रक्त जाऊ लागते. लघवी बाहेर पडण्याला येणारा अडथळा वाढत जातो. मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊन अखेर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.
नियमित तपासणी आणि डॉक्टरांशी चर्चा करून पुरुष त्यांच्या प्रोस्टेट आरोग्याची काळजी घेऊ शकतात, ज्यामुळे वेळीच निदान झाल्याने परिणामकारक उपाय करता येतात आणि जीवनमान सुधारू शकते.
About The Author

