
31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत युरोप-नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषय तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब, त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या- त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटी या दौऱ्यात देण्यात येणार आहेत. या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता उंचावणे हा या दौऱ्यांमागील उद्देश आहे.
युरोपातील नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशात फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, इस्राईल मध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण, जपानची सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान ही तेथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत. मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाईन्स या देशात फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान, चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरिया देशात आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान पहायला मिळाणार आहे.
शेतकरी अभ्यास दौऱ्याकरीता निवडीचे निकष पुढील प्रमाणे राहील. लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. स्वत:च्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उत्तारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र, शेतकऱ्याचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. आधार प्रमाणपत्राची प्रत द्यावी. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. शेतकऱ्याचे वय २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकरी वैध पारपत्रधारक असावा. शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए अभियंता, कंत्राटदार आदी नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसाहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख प्रती लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे. शेतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा १०० टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगावू स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानार्थ रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल.
इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
About The Author
