
तळेगाव दाभाडे: प्रतिनिधी
येथील सुशीला मंगल कार्यालयात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार (दि. १९)जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व गणेश मंडळांना डीजेचा वापर पूर्णत: टाळण्याचे आवाहन केले. डीजेचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला तसेच गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्याचे प्रदूषण टाळण्याचीही आवाहन करण्यात आले. गणेश मूर्ती निर्माल्य नदीमध्ये अथवा तलावामध्ये टाकू नये. क्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जन करू नये. यावेळी माजी नगराध्यक्षा मीरा फल्ले, माजी नगरसेवक अरुण बबनराव माने, माहिती अधिकार कार्यकर्ते जयवंतराव कदम, श्रीकांत मेढी, तळेगाव गोल्डन रोटरी चे उपाध्यक्ष प्रशांत रामचंद्र ताये आदीनी गणेशोत्सवात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय मांडले. या बैठकीस पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे प्रवीण कांबळे, माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक भरत वारे, दत्तात्रेय बनसुडे तळेगावातील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author
