महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम
तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘गोल्डन रोटरी पिंकेथॉन 2026’ या उपक्रमाला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गोल्डन रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती आणि स्वच्छतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद दिला.
कार्यक्रमादरम्यान नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी “स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव आणि हरित तळेगाव” घडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहराच्या विकासात सक्रिय भूमिका निभावण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
या पिंकेथॉनच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. विविध उपक्रमांद्वारे महिलांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सिने अभिनेत्री प्रियंका हांडे यांनी तळेगावातील महिलांची आरोग्याविषयीची जागरूकता पाहून समाधान व्यक्त करत त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला नगरसेविका संगीता खळदे, आशा भेगडे, शैलजा काळोखे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे, डिस्ट्रिक्ट टीममधील दीपक फल्ले, किरण ओसवाल, दिशा वाईकर, मेधा शिंदे, सुजाता देव आणि कविता खोल्लम यांची उपस्थिती लाभली. रोटरी डिस्ट्रिक्टचे डीजी चारुकशोत्री यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांची समाजात मोठी गरज असल्याचे अधोरेखित केले
कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी २० लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. संकेत सारीच्या मानाच्या पैठणीचे बक्षीस सुरेखा रुपनवर आणि श्रेया बाविस्कर यांनी जिंकले. तसेच चिखले एक्वा फिल्टरचे बक्षीस अमृता पाटील यांना, तर साई कम्युनिकेशनच्या भेटवस्तू स्वागती घारे, सभागती घारे आणि सुषमा खोत यांना मिळाल्या. विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व मान्यवरांनी आणि सहभागी सदस्यांनी स्वच्छतेचा आदर्श घालत “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश दिला. हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर प्रशांत ताये यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन रोट्रॅक्टचे अध्यक्ष ललित देसले आणि क्लबच्या सर्व सदस्यांनी केले.
About The Author

