तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
इतिहासाच्या चक्षुणे यादवांचा देवगिरी पहिला तर ऐतिहासिक दृष्ट्या प्रचंड समृद्धतेची प्राप्ती या दुर्गास झालेली निदर्शनास येते. देवगिरीच्या ऐतिहासिक समृद्धतेच्या पाऊलखुणा आपल्या निश्चितच प्राचीन कालखंडाकडे घेऊन जातात. अखंड भारताच्या समृद्ध प्राचीन काळाची अखेर, धामधूमीच्या मध्ययुगाचा प्रारंभ या महादुर्गाने अर्थातच राजधानीने पाहिला आहे. इतिहासाचे हे प्राचीन व प्राथमिक साधन आपल्याला दक्षिणेचा विश्वासार्ह इतिहास सांगते. या दुर्ग वृक्षाचे बोट धरून चला इतिहासाच्या अथांग सागरात वैभवी हिंदुस्तान समजावून घेऊयात.
देवगिरी हा पौराणिक काळातील दुर्ग असल्याने भगवान शंकर व पार्वतीची येथील कथा लोकप्रिय आहे. सरीपाटाचा डाव खेळत असताना माता पार्वतीने डाव जिंकला आणि क्षोभ व त्यागाने महादेव भगवान वेरूळाच्या घनदाट जंगलात निघून गेले. त्यावेळी समजूत काढावी म्हणून इतर देव देवगिरी आश्रयास आले. त्यास्तव या पर्वताचे नाव देवगिरी असे जनमानसात रुढ झाले. प्राचीन काळापासून या पर्वताच्या बलाढ्य बांधणीला सुरुवात झाली. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने इ.स. ७५५ मध्ये पर्वत खोदून दुर्ग बांधणीचा पाया घातला. राष्ट्रकूट हे चालुक्याचे मांडलिक बनल्याने देवगिरी चालुक्याकडे आला. यादव हे चालुक्यांचे सामंत होते. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याने चालुक्यांना जिंकून ११८७ मध्ये देवगिरीवर स्वतः राज्याभिषेक करून घेतला व देवगिरी राजधानी करून तिचे वैभव कालातील केले. भिल्लम देव नंतर चैत्रपाल सिंघना, महादेव रामचंद्र देव असे राजे गादीवर येत राहिले. राजधानीच्या दुर्गाची प्रतिष्ठा मोठी बनली. तद्वतच इंद्रनगरीशी स्पर्धा करणारी देवगिरी आणि तिची श्रीमंती पाहून उत्तरेचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी हा दक्षिणेत ८००० सैन्यानिशी पोहोचला.
अल्लाउद्दीन मोठा कसदार योद्धा होता. शिताफिने खोटे बोलणे अफवा उठवणे हा त्याच्या युद्ध कलेचा भाग होता. धील्लीका म्हणजेच राजधानी दिल्ली मध्ये सुलतानाच्या सोबत बिनसल्याने आपण नशीब आजमावण्यासाठी दक्षिणेत आलो आहोत, अशी हुल त्याने उठवली. तो फेब्रुवारी १२९४ साली देवगिरी जवळ लाजूर येथे बारा मैल अंतरावर पोहोचला. तेव्हा कान्हा या लष्करी अधिकाऱ्याने रामदेवरायास खिलजीची कपटी चाल कळविली. येथून पुढे रामदेवरायाने सैन्य खिलजी विरुद्ध पाठवले. मात्र ते खिलजीने पराभूत केले. युवराज शंकरदेव यादव होयसळाशी लढण्यात गुंतला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन अल्लाउद्दीनने देवगिरी वेढले आणि नखशिकांत लुटले.
यादवांची फौज व रामदेवराय सर्वांनी दुर्गाचा आश्रय घेतला. खिलजीने पन्नास मन सोने व अगणित हिरे, मानके, पाचु, मोती तसेच राजकन्या ज्येष्ठापल्लवी (जेठाई) तिची मागणी केली. याच वेळी दिल्लीहून अधिक फौज येत आहे, अशी अफवा अल्लाउद्दीन ने पसरवली. अगदी त्वरेने शंकर देव देवगिरीच्या मदतीस धावून आला. मात्र रामदेवराय यादव हा दिल्लीच्या फौजेच्या भीतीने दुर्गातून बाहेर पडला नाही. देवगिरीची मान अल्लाउद्दीन आवळली, आता मागणी वाढली. त्यात साठ मन सोने, दोन मन हिरे, १०० मन चांदी, रेशमी वस्त्राची चार हजार ठाणे तसेच एलीचपुर परगाना खर्चासाठी तोडून मागितला. प्रतिवर्षी खंडणी देवगिरीच्या उरावर बसली.
देवगिरीची लूट अल्लाउद्दीनला एका अर्थाने लाभली. पुढील वर्षी १२९५ साली जलालुद्दीनचा खून करून अल्लाउद्दीन सुलतान बनला. पुढील काही वर्षात शंकरदेवाणे खंडणी थांबवली. तेव्हा पुन्हा मालिक कापूर तेराशे सात साली तीस हजार सैन्य घेऊन आला आणि प्रथमच खचलेल्या यादव सैन्याचा पराभव करीत रामदेवरायास कैद करून दिल्लीस बंदी बनवून नेला. सुलतानने त्यास ‘रायरायान’ पदवी देऊन पुढील चाल खेळली. रामदेवराय यादव हा तहहयात देवगिरी सह दिल्लीचा मांडलिक बनला. १३०९ साली रामदेवराय मरण पावल्यावर शंकरदेव सम्राट बनला व त्याने मांडलिकत्व झुगारून टाकले.
विलंब न लावता पुन्हा मलिक कापूर दक्षिणेत येऊन युद्ध झाले. शंकर देवास मारण्यात आले. दरम्यानच्या काळात मलिक कापूर देवगिरीवर दोन-तीन वर्ष राहिला. अनेक मंदिरांचा त्याने विध्वंस करून त्याने अनेक मशिदी त्यावेळी बांधल्या. प्रचंड वेदनात येथील मुलुख जगत असता रामदेवरायाचा जावई हरपालदेव याने पुन्हा देवगिरी स्वतंत्र केली. दिल्लीस १३१६ साली अल्लाउद्दीनचा खून झाला. मात्र खुनशी मुबारकखान सुलतान होऊन त्याने १३१८ साली पुन्हा स्वतंत्र झालेली देवगिरी फोडली. यावेळी निर्भसना करून हरपालदेवाची कातडी जिवंतपणे सोलण्यात आली.
दिल्ली सिंहासनावर १३२२ मध्ये मुहम्मद तुघलक सुलतानपदी बसला. याला दक्षिणी लोक ‘येडा महम्मद’असे संबोधत. देवगिरीची ख्याती आणि महती ऐकून वा पाहुन इतका प्रभावित झाला की भारताची राजधानी देवगिरी असावी असे ठरवून त्याने दिल्लीहून सर्व लावाजमा देवगिरी येथे हलवला. इन्वबतुता हा समकालीन लेखक म्हणतो की, आंधळ्याने नकार दिला तेव्हा त्यास फरफडत देवगिरीसं आणले. साधारणपणे १० वर्षांनी पुन्हा तुघलक उत्तरेच्या संरक्षणासाठी दिल्लीत गेला आणि दक्षिणेच्या सरदारांनी बंड करून त्यातून पुढे हसन गंगू बहमनी म्हणजेच बहमणी सुलतानाचा उदय झाला. दिनांक ३ डिसेंबर १३४७ साली हसन गंगू हा देवगिरी दुर्गावर सुलतानपदी विराजमान झाला. बहमणीची शकले झाल्यावर त्यातून निर्माण झालेल्या निजामशाहीकडे १४८९ साली देवगिरी गेला. निजामशाहीने या दुर्गास राजधानी बनविले. जिजाऊ साहेब यांचे वडील लखोजीराजे जाधवराव व त्यांचे पुत्र यांना सफदरखान व फरीदखान याने कपटाने याच देवगिरीच्या दरबारात मारले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाई व शाहू यांना काही काळ देवगिरी मध्येच कैदेत ठेवले होते. अटकेपार झेंडा फडकविलेल्या मराठ्यांना अशक्य काय होती. मात्र देवगिरी मराठ्यांना दरम्यान घेता आला नाही. १७६० साली अल्प वर्षासाठी देवगिरी मराठा सत्तेच्या ताब्यात आला. मात्र राघोबादादास मदत करण्याच्या बोलीवर निजामाने देवगिरी स्वतःच्या ताब्यात घेतला. पुन्हा मराठी सत्तेकडे देवगिरी कधीही आला नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर निजामावर सैनिकी कारवाई भारत सरकारने केली. त्यावेळी स्वतंत्र भारतात ही राजधानी समाविष्ट झाली.
इतिहास सुवर्णाचा असो वा कोळशाचा मात्र देवगिरी सारखा बलदंड दुर्ग या पृथ्वीवर अस्तित्वात नाही, हे सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवराय म्हणतात “देवगिरी पृथ्वीवर चखोट गड खरा” दक्षिणेतील एकाच दुर्गास भारताची राजधानी होण्याचे भाग्य लाभले. तो म्हणजे देवगिरी होय. आजही बहुतांश तोफा येथे पाहावयास मिळतात. अप्रतिम खंदक तसेच भुयारी मार्ग प्रत्येक दुर्गप्रेमीच्या काळजाचा ठेकाच होतो. मोठी मंदिरे, मशिदी, मिनार, महाद्वारे, तोफा, बारदरी, पाण्याचे टाकं निरनिराळ्या कालखंडात बांधलेले बुरुज हे सर्व आपल्या मनास ऐतिहासिक साद घालत आपले बोट धरून इतिहासात घेऊन जातात.