तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी
अल्फा-क्लोरालोज (α-chloralose) हा एक विषारी अंमली पदार्थ आहे, जो उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पक्षी मारण्यासाठी सर्रासपणे वापरला जातो. लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
या शोधनिबंधामध्ये अल्फा-क्लोरालोज कीटकनाशक हे मानवी शरीरासाठी मध्यम प्रमाणात विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे. “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड” सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जेच्या उच्च प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी सामान्यत: ३४८० डॉलर (सुमारे तीन लाख रुपये) प्रकाशन शुल्क संशोधकांकडून घेतले जाते. परंतु, या संशोधनाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि समाजासाठी असलेले उपयुक्ततेचे कारण वरील नियतकालिकाच्या प्रमुखांनी लक्षात घेतले असल्यामुळे, हे संशोधन विनामूल्य प्रकाशित करण्यात आले आहे. हा शोधनिबंध प्रकाशित होण्यासाठी एक वर्ष इतका कालावधी लागला आहे.
प्रोफेसर डॉ. रंजना जाधव व प्रोफेसर डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांच्या संशोधन गटाने हे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यासाठी या संशोधकांना प्रचंड मेहनत करावी लागली आहे.
अल्फा-क्लोरालोज हे सस्तन प्राणी आणि मासे यांच्यासाठी मध्यम प्रमाणात विषारी असले तरी, ते मांजरी, कुत्रे आणि पक्ष्यांसाठी अत्यंत विषारी आहे. मानवांमध्ये बऱ्याचदा हे कीटकनाशक आत्महत्या करण्यासाठी वापरले जात आहे. हे मज्जातंतूविज्ञान आणि पशुवैद्यकीय औषधांमध्ये भूल देण्यासाठी औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. तसेच, आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना (WHO) ने अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाला मध्यम धोकादायक कीटकनाशक म्हणून वर्गीकृत केले आहे.
शेतात आणि घरात वापरण्यात येणारी कीटकनाशके मानवी शरीरास घातक असतात, यावर संशोधन कमी असल्याचे दिसते. याच कारणास्तव, या संशोधन गटाने अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची मानवी रक्तातील सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत होणारी आंतरक्रिया तपासण्याचा निर्णय घेतला. या संशोधनातून अल्फा-क्लोरालोज केवळ उंदरांसाठीच नाही, तर मानवी शरीरासाठीही विशेषतः रक्तातील सिरम अल्ब्युमिन प्रथिनांवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आहे.
या संशोधनासाठी प्रोफेसर डॉ. टॉम चेरीयन (कन्नूर विद्यापीठ, केरळ), डॉ. सतीश पवार (सोलापूर विद्यापीठ), डॉ. किरण लोखंडे आणि प्रोफेसर डॉ. तन्वीर वाणी (किंग सौद युनिव्हर्सिटी, सौदी अरेबिया) यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.
डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांना संशोधनाची गोडी आहे. त्यांचे हे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जेच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून, महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. या शोधनिबंधाची दखल आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांद्वारे घेतली गेली आहे, ज्यामुळे लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामधील प्राध्यापकांच्या नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे व जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये या प्राध्यापकांची नावे समाविष्ट झाली आहे.
डॉ. मल्हारी नागटिळक हे थायलंड येथून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेचे ‘समीक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांचा “कार्बोफ्युरॉन कीटकनाशक” या विषयावर शोधनिबंध फ्रान्स येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जनरल ऑफ मॉलिक्युलर स्ट्रक्चर, इम्पॅक्ट फॅक्टर ४.०” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे व त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझील, चीन, थायलंड, टर्कीतील शास्त्रज्ञांनी त्यांच्या शोधनिबंधामध्ये संदर्भ म्हणून घेतली गेलेली आहे. या शोधनिबंधामुळे लोणावळा महाविद्यालयाला जागतिक संशोधन नियतकालिकाच्या यादीमध्ये अंतिराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे आणि लोणावळा महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.
लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी डॉ. मल्हारी नागटिळक आणि प्रा. संदीप लबडे यांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
संशोधनाची पद्धत:
• पॉयझन सेंटर मोरोक्कोच्या २०१४ च्या वार्षिक अहवालानुसार, अल्फा-क्लोरालोज हे कीटकनाशक विषबाधाचे दुसरे सर्वात वारंवार कारण म्हणून ओळखले जाते, त्यामुळे या रासायनिक संयुगाची निवड केली.
• मानवी रक्तातील विद्राव्य प्रथिन सिरम अल्ब्युमिन सोबत अल्फा-क्लोरालोज च्या आंतरक्रिया तपासण्यात आल्या.
• यासाठी उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करण्यात आला.
निष्कर्ष:
अल्फा-क्लोरालोज रक्तातील विद्राव्य प्रथिनासोबत मध्यम बंध तयार करतात.
या बंधामुळे मानवी शरीरात हे कीटकनाशक मध्यम काळासाठी टिकतात.
परिणामी, याच्यापासून होणारे दुष्परिणामाची तीव्रता मध्यम आहे.
हे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना (WHO) २००९ च्या कीटकनाशक धोक्याच्या वर्गीकरणाशी सुसंगत आहेत.
ही पद्धत नवीन आणि कमी विषारी कीटकनाशके तयार करण्यासाठी उपयोगात आणता येईल.
अल्फा-क्लोरालोजचे दुष्परिणाम:
तीव्र विषबाधा झालेल्या मानवांमध्ये अल्फा-क्लोरालोजचा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो, ज्यामुळे उपशामक, भूल आणि पाठीच्या प्रतिक्षेपांवर उत्तेजक प्रभाव पडतो, तसेच श्वासोच्छवास अनियमित होतो, कोमा, नैराश्य, अर्धांगवायू आणि उत्स्फूर्त आघात निर्माण होतात.
उपाययोजना :
परवान्याशिवाय कृषी क्षेत्रात अल्फा-क्लोरालोजचा वापर टाळायला हवा.
पर्यायी औषधांसह उपचारावर अधिक संशोधन आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या वापरावर, वापरासंबंधी आणि त्यांच्या वर्तनातील बदलाबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.