Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

वडगाव शहराचे नागरीकरण मोठ्या झपाट्याने वाढत चालले असून शहराचा विस्तार ही तीव्र वेगाने वाढू लागला आहे. एखादे शहर विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा हळू-हळू आकार घेत असते तेव्हा त्या ठिकाणच्या अस्तित्वात असणाऱ्या पायाभूत सुविधा या अपुऱ्या असतात व शहराच्या प्रगतीसाठी नवनवीन सुविधांचा अंतर्भाव केल्याने त्या नागरिकांसाठी अत्यंत निर्णायक ठरत असतात तसेच त्या उचितपणे, सातत्याने व वेळेवर पुरविण्याची नैतिक जबाबदारी ही त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर असते. याच अनुषंगाने वडगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत मार्फत पुरवली जाणारी अत्यंत महत्त्वाची सुविधा म्हणजे कचरा संकलन करणे जे, संपूर्ण शहरात दररोज घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करून पुरविण्याचा प्रयत्न केला जातो.

मात्र तो कचरा पूर्णतः संकलित होतो असं नाहीच कचरा गाडी वेळेवर न येणं, गाड्यांची अपुरी संख्या किंवा आवाज ऐकू न येणे अशा एक ना एक कारणास्तव नागरिकांच्या घरामध्ये दैनंदिन उचलला जाणारा कचरा हा तसाच पडून राहत असतो त्यामुळे नागरिक तो कचरा गाडीमध्ये न टाकता सर्रासपणे रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकतानाचे निदर्शनास येत आहे. इतरत्र पडलेल्या कचऱ्यामुळे शहरात मोठी दुर्गंधी पसरू लागली असून जागोजागी अस्वच्छतेचे प्रदर्शन दिसू लागल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होऊ लागली आहे परिणामी वाढत चाललेल्या कचऱ्याच्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी वडगाव नगरपंचायत मार्फत अत्यंत शीघ्रतेने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे, अशी माहिती वडगाव नगरपंचायतीच्या मा. उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना निवेदन देऊन मागणी केली.

शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या कचरा गाड्यांची संख्या वाढवून सकाळच्या सत्रात कचरा संकलन करून गाड्यांचे सुधारित वेळापत्रक व तक्रार निवारणासाठी संपर्क नंबर जाहीर करून नागरिकांना कचरा गाडीत कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच सर्रासपणे उघड्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.आवश्यकता भासत असल्यास यासाठी सीसीटीव्हीचा वापर करावा. वरील उल्लेखित मुद्द्यांवर आपल्या स्तरावरून त्वरेने उपाययोजना अस्तित्वात आणावी जेणेकरून आपला सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना स्वच्छतेची प्रेरणा देऊ शकतो. या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नगरपंचायत कार्यालयात कचरा टाकून आंदोलन करेल, असा इशारा वडगाव मावळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *