Spread the love

दिलीप प्रभावळकर यांच्या प्रकट मुलाखतीसह विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथील सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या ‘कलापिनी’ संस्थेच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत संस्थेच्या आगामी योजनांचा आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा मांडण्यात आला.

या पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, कार्याध्यक्ष अंजली सहस्त्रबुद्धे, तसेच विनायक भालेराव, अशोक बकरे, लीना परगी, चेतनशहा आदी मान्यवर उपस्थित होते.

1977 साली स्थापन झालेल्या ‘कलापिनी’ संस्थेने गेल्या चार दशकांहून अधिक काळात तळेगावच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. शहरापुरती मर्यादा न ठेवता या संस्थेने आपली ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आहे. बालभवन, नाट्यकला, गायन, नृत्य, आरोग्य आणि विविध कलांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना घडवण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे.

यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त 10 एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रकट मुलाखत हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच ‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील असणार आहेत.

पत्रकार परिषदेत विविध कला विभागांच्या प्रमुखांनी आपल्या उपक्रमांचा आढावा सादर केला. नाट्यकला, बालभवन, हास्ययोग आणि संगीत विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे संस्थेची सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले, तर विनायक भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

कलापिनी संस्थेचा 49 वा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सव नसून, तळेगावच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा सोहळा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *