Spread the love

यशवंत नगर परिसरातील पाणीटंचाईवर मोठा दिलासा

तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने यशवंत नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तीन एमएलडी क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी (दि. 5 एप्रिल) सकाळी दहा वाजता उत्साहात पार पडले. मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे होते.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती गणेश मोहनराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक निखिल भगत यांनी केले, तर प्रास्ताविक मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी मांडले.

या जलशुद्धीकरण केंद्रामुळे स्टेशन परिसरातील रेणो कॉलनी, विद्या विहार कॉलनी, सत्यकमल कॉलनी तसेच म्हाडा कॉलनी या भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे मत गणेश काकडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, नगरपरिषद नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असून उर्वरित पाणी समस्याही टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावर भर देत, “नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार पाणीपुरवठा करणे हे आमचे प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ते सर्व उपाय लवकरच राबवले जातील,” असे आश्वासन दिले.

आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भाषणात दीर्घकालीन उपाययोजनांवर प्रकाश टाकला. आंद्रा धरणाच्या पाणी आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असून, पुढील दोन ते तीन वर्षांत नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे तळेगाव दाभाडे शहरातील पाणीटंचाई कायमची दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पाणी समस्येवर हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

कार्यक्रमाची सांगता नगरसेविका ऋतुजा भगत यांनी आभार प्रदर्शन करून केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *