Spread the love

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे शहरात यंदा भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा केला जाणार आहे. ‘एक गाव, एक मिरवणूक’ या संकल्पनेतून रमाकांत तरुण मंडळ तळेगाव दाभाडे आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

14 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता रमाकांत नगर येथे धम्मपूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, त्यांचे मार्गदर्शनही नागरिकांना मिळणार आहे. समाजात बंधुता, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या धम्मपूजेद्वारे जयंती उत्सवाची सुरुवात होणार आहे.

त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता रमाकांत नगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे. गणपती चौक, खडक मोहल्ला, बाजारपेठ, मारुती मंदिर चौक मार्गे जिजामाता चौक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

जिजामाता चौक येथे विविध मंडळांचा सत्कार करण्यात येणार असून, मिरवणुकीदरम्यान चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी तसेच जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत डीजे साऊंडचा वापर टाळण्यात आला असून ढोल-ताशा, बँड-बाजा आणि महिलांच्या लेझीम पथकांचे सादरीकरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.

मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात येणार आहेत. तसेच डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून चौकाचौकात बाबासाहेबांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात येणार आहेत. यामुळे नव्या पिढीला बाबासाहेबांचे विचार आणि कार्य समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

मागील वर्षी या मिरवणुकीला सहा ते साडेसहा हजार नागरिकांचा सहभाग लाभला होता. यंदा हा आकडा 12 हजारांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

जयंती उत्सवानिमित्त 15 एप्रिल रोजी ‘होम मिनिस्टर’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 16 एप्रिल रोजी लहान मुलांच्या नृत्यकलेचे कार्यक्रम होणार असून, 17 एप्रिल रोजी ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी लाभणार आहे.

हा जयंती उत्सव शांतता, शिस्त आणि एकतेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व भीम अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रमाकांत तरुण मंडळ व जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे शहरात आयोजित करण्यात आलेला हा जयंती उत्सव केवळ उत्सव न राहता सामाजिक एकात्मता आणि विचारप्रबोधनाचा संदेश देणारा ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *